ऋतुमानानुसार आपापले आवास बदलणारे अनेक प्राणी-पक्षी आहेत. काही पायी चालत, धावत स्थलांतरीत होतात, काही खोल समुद्राच्या प्रवाहासोबत स्थलाम्तरीत होतात तर काही वायु मार्गाने स्थलांतरीत होतात. एकेकाळी मनुष्यदेखील स्थलांतर करणा-या प्राण्यांसारखाच निवास स्थान बदलणारा एक प्राणी होता.
आज आपण माहिती घेणार आहोत, आकाशमार्गे, खुप मोठ्या संख्येने स्थलांतर करणा-या पक्षांच्या बाबतीत. मराठी मध्ये आपण या पक्ष्यास रोहित किंवा हंसक असे म्हणतो.
रोहित पक्षी प्रामुख्याने मचूळ पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवरे व खाडी अशा परिसंस्थेतच थव्याने आढळतात. ऋतु जसे बदलतात तसे अन्न व ऊब यांच्या शोधात हे पक्षी स्थलांतर करतात. अक्षरशः लाखोंच्या संख्येने या पक्ष्यांचे थवेच्या थवे उंच गगनी उडताना दिसतात. बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरा या गीतातील दृश्य प्रत्यक्ष पहायला मिळते जर तुम्ही त्यांच्या विहंगमाच्या आसपास असाल तर.
स्थलांतर –
फ्लेमिंगोंचे हे स्थलांतर दोन प्रकारचे असते. भारतातल्या भारतात होणारे स्थलांतर म्हणजे स्थानिक स्थलांतर. यामध्ये राजस्थानातील कच्छ मध्ये अधिवास असलेले फ्लेमिंगो पक्षी अन्न व निवा-या साठी देशात इतरत्र जातात. यातील अनेक पक्षी मुंबई कडे येतात तर काही भिगवण च्या उथळ उजनी जलाशयाच्या परीसरात येतात. भारतात आढळणारे व इथलेच हे रोहित पक्षी छोटे रोहित म्हणजे लेसर फ्लेमिंगो आहेत.

परदेशातुन, भारतामध्ये विशेषतः भिगवण ला जे फ्लेमिंगो येतात ते प्रामुख्याने युरोप, रशिया, सायबेरिया, मंगोलिया, तिबेट, आफ्रिका अश्या प्रदेशांतुन येत असतात. यातील कित्येक पक्षी तर १० हजारापेक्षा हे जास्त किमी चा प्रवास करतात. या पक्षांचा हा प्रवास जास्त करुन रात्रीच्या वेळी होत असतो. यांची संख्या इतकी जास्त असते की नागरी विमान कंपन्यांना देखील या पक्षांच्या स्थलांतराच्या कालवधीमध्ये विशेष काळजी कक्ष बनवावे लागतात.
फ्लेमिगोंचे हे थवे हिवाळ्यात, नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास खाद्याच्या शोधात महाराष्ट्राच्या दिशेने येतात. ते इथे येतात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची तपकिरी रंगाची पिल्लंही पाहायला मिळतात. मुंबईच्या किनाऱ्यावर, उजनीच्या जलाशयात ही पिल्लं मोठी होऊ लागतात. परतीच्या प्रवासापर्यंत त्यांच्या पंखांना लालसर छटा येऊ लागते.
पंख लाल-गुलाबी कसा काय ?

उथळ जलाशयात असलेलं विशिष्ट प्रकारचं शेवाळ, छोटे मासे हे त्यांचं मुख्य खाद्य आहे. या खाद्यामध्ये बिटा कॅरोटिनचं प्रमाण जास्त असतं. या द्रव्यामुळेच त्यांच्या पंखांना लालसर गुलाबी रंग येतो.
रोहित पक्षी प्रामुख्याने मचूळ पाणथळ जागा, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवरे व खाडी अशा परिसंस्थेतच थव्याने आढळतात. चोचीच्या विशिष्ट रचनेमुळे तो डोके, चोच संपूर्णपणे पाण्यात बुडवून पाण्यातील तसेच चिखलातील खाद्य गाळून घेतो. स्पिरुलिना शैवाल, पाणवनस्पती, बिया, डिंभ, पाणकीटक, लहान मासे, कोळंबी, खेकडे व शिंपले हे त्याचे मुख्य खाद्य आहे. त्याने सेवन केलेल्या प्राणी-प्लवकातील व वनस्पती-प्लवकातील कॅरोटिनॉइड प्रथिनांवर यकृतातील विकरांची प्रक्रिया होऊन त्यांचे विघटन होते आणि रंगद्रव्ये तयार होतात. या रंगद्रव्यांमुळे रोहित पक्ष्याच्या शरीराचा रंग गुलाबी दिसतो. रोहित पक्ष्याचा आयु:काल ६० वर्षे किंवा त्याहून अधिक असतो. रोहित पक्षी इंग्रजी V आकार किंवा वक्राकार रचना करून शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने आकाशात उडतानाचे दृश्य विलोभनीय असते.

रोहित पक्षी समाजप्रिय आहे. त्यांच्या वसाहतीत हजारो पक्षी असतात. या मोठ्या आकाराच्या वसाहतींमुळे त्यांचे भक्षकांपासून रक्षण, अन्नाचा पुरेपूर वापर आणि घरटी बांधण्यासाठी कमी उपलब्ध असलेल्या जागेचा कार्यक्षम वापर ही उद्दिष्टे साध्य होतात. विणीचा हंगाम सुरू होण्याआधी या वसाहतींमध्ये १५–५० पक्ष्यांचे लहानलहान गट तयार होतात. भारतात गुजरात राज्यातील कच्छच्या रणात विणीच्या हंगामात रोहित पक्षी (lesser Flamingo) मोठ्या संख्येने जमा होतात. चिखलाच्या लहानलहान गोळ्यांनी तयार केलेले रोहित पक्ष्याचे घरटे वरच्या बाजूस खळगा असलेल्या शंकूच्या आकाराचे असते. दर खेपेला मादी घरट्यात एक निळसर रंगाचे अंडे घालते. जवळजवळ महिनाभर ते अंडे नर-मादी मिळून उबवितात. पिलांचा रंग भुरकट लाल असतो. पिलाचे संगोपन नर-मादी मिळून करतात.

भिगवण ला डिसेंबर महिन्यामध्ये या पक्षाचे आगमन होते. या परिसरात फ्लेमिंगो पुढील तीन ते चार महिने राहतात. भिगवण येथील उजनी जलाशय उथळ असल्याने व विस्तीर्ण असल्याने या ठिकाणी फ्लेमिंगोंना मुबलक खाद्य मिळते. त्यांच्या मुळ अधिवासातील ऋतुबदलांचे संकेत त्यांना बदलणा-या वा-यांमुळे मिळतात. ग्रीष्माच्या झळा सुरु होण्यापुर्वीच हे रोहित पक्षी (ग्रेटर फ्लेमिंगो) पुनः त्यांच्या मुळ आवासात परततात. तिकडेच त्याचा विणीचा काळ सुरु होतो. पण त्या विणीच्या हंगामाची सुरुवात मात्र काहीशी उजनी जलाशयातच होते, एकमेकांचे साथीदार शोधण्यापासुन.

लेख आवडल्यास अवश्य शेयर फॉरवर्ड करा.
आपला,
हेमंत सिताराम ववले
९०४९००२०५३


